चिनी मांजाला बंदी घालण्याचा मुख्य सभेत ठराव करू : महापौर मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पतंगाच्या मांजामुळे अनेक प्राणी, पक्षी आणि नागरिकांना ईजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी मांजाला बंदी घालण्याचा ठराव मुख्य सभेत करू अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी आयोजित बैठकीत त्यांनी केली.

महापौर म्हणाल्या की, चिनी मांज्या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा असून या विषयी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच पारंपारीक खेळावर बंदी घालणे हा उपाय होऊ शकत नाही. त्यावर जनजागृती करून तोडगा काढता येईल. अतिक्रमण विभागाने अनधिकृत विक्रेत्यावर कडक कारवाई करायला हवी.अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस म्हणाले की,शहरात कुठे ही पतंग उडवित असताना दिसल्यास नागरिकांनी त्वरित नियंत्रण कक्षाला कळवावे. तसेच यामध्ये आधिकधिक नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शितल उगले म्हणाल्या, एनजीटीच्या निकालासमोर पूर्ण देशात चायनिज मांजावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानुसार अशा वस्तू साठवणे आणि बाळगण्याला बंदी आहे. पतंग कट करण्याची स्पर्धा जेव्हा सुरू केल्या तेव्हापासून हा घातक मांजा वापरण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे जेथे हा मांजा दिसेल तेथे तक्रार करा. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, पतंगाचे वेड हे मध्य शहरातच जास्त आहे. उपनगरात पतंगांची दुकानेही नाहीत. महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक कृति समिती नेमावी. चिनी मांजाचे देशांतर्गत उत्पन्न होत असेल ते मुळ उत्पन्नच थांबविणे गरजेचे आहे. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

शनिवारवाड्या समोरील पुलावरून जाताना सुवर्णा मुजुमदार यांचा गळा मांज्याने कापला गेला. त्या घटनेत सुवर्णा या गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना. त्यांची प्राणज्योत मालवली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली चिनी मांजा वापरा बाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे,नगरसेवक महेश लडकत, सुनिता वाडेकर, अजय खेडोकर,ज्येष्ठ पत्रकार सुनिल माळी, अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि सहायक पोलिस निरीक्षक (स्पेशल ब्रँच) आरती खेतमाळीस आदी उपस्थित होते.