चोरांची व्यापाराला मारहाण, नागरिकांचा रस्ता रोको

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन
चोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत अडत व्यापाराला आणि त्याच्या कुटुंबियांना जबर मारहाण केल्या प्रकरणी लासुर स्टेशन परिसरातील नागरिकांनी आज ‘रस्ता रोको’ केला. या ‘रस्तारोको’मुळे वाहनांच्या तीन तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

लासुर स्टेशन येथील लोकप्रिय अडत व्यापारी विनोद जाजू यांच्या कुटुंबियांना मध्यरात्री चोरट्यांनी घरात शिरून मारहाण केली. मारहाणीनंतर मुद्देमाल लंपास केला. यामध्ये जाजू कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे. घटना घडल्यानंतर शिल्लेगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पण लासुर स्टेशन परिसरात सातत्याने अशा घटना घडत आहेत. अनेक व्यापाऱ्यांच्या घरी चोऱ्या आणि दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आज सकाळपासूनच रस्त्यावर येत रस्ता रोकोला सुरुवात केली. त्यामुळे औरंगाबाद मुंबई महामार्ग पूर्ण जाम झाला आहे. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी रास्ता रोको सुरूच ठेवला आहे. जोपर्यंत पोलीस अधीक्षक येणार नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. असा इशारा नागरिकांनी दिला आहे.