जन्मदात्रीनेच मुलांना विहिरीत ढकलले

नारायणगाव : पोलिसनामा ऑनलाईन
जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथे उघडकीस आली. नारायणगाव पोलिसांनी आठवड्याभरात या प्रकरणाचा छडा लावला.
चांगुणा (सविता) दशरथ आतकरी (वय २८, आतकरी मळा, सुलतानपूर, ता.जुन्नर) असे आरोपी आईचे नाव आहे. तर आरू दशरथ आतकरी (वय : ६), साहिल दशरथ आतकरी (वय : ४.५) अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी मुलांचे वडील दशरथ आतकरी यांनी मुलांच्या आईविरुद्ध मंगळवारी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांगुणा व दशरथ आतकरी यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या चार जणांचा सांभाळ चांगुणाला करावा लागत होता. मुलाच्या हव्यासापोटी तीन मुली व एक मुलगा सांभाळणे तिला नको वाटायचे. तिला पहिली मुलगी झाली तेव्हा ही एकच मुलगी असावी असे तिला वाटत होते. रोज शेतातील कामे, गुरे पाहणे ही रोजची कामे करावी लागत होती. या संसाराला चांगुणा वैतागली होती. त्यामुळे तिने या पूर्वीही मुलांना मारण्यासाठी विहिरीवर घेऊन गेली होती.

फेब्रुवारी महिलाना अखेरीस सकाळी चांगुणा व दशरथमध्ये शर्टावरून वाद झाला होता. त्या वेळी तिने तुझ्या वंशाला दिवा ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी आरू व साहिलला घेऊन ती शेतात गवत कापण्यासाठी गेली. संध्याकाळी सहाच्या सुमारास शेताजवळील संपत जगदाळे यांच्या विहिरीत मुलाला ढकलून दिले. हा प्रकार मुलीने पाहिल्याने भीतीपोटी तिने मुलीलाही विहिरीत ढकलून दिले. दोन मुले दिसत नसल्याने दशरथने पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक दीपक साबळे, आबा चांदगुडे, शंकर भवारी, रामचंद्र शिंदे , दिनेश साबळे यांनी सखोल तपास सुरू केला.

संशयाची सूई चांगुणावर असल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यानंतर तिने दोन्ही मुलांच्या खुनाची कबुली दिली. पोलिसांनी तीन मार्चला चांगुणाला अटक करून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. जुन्नर न्यायालयात तिला न्यायालयीन कोठडी दिली आहे.