जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई अभियानात स्वच्छता दूत अंजली भागवत घेणार सहभाग

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईन

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. येत्या रविवारी (दि. 4 फेब्रुवारी, 2018) रोजी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत.

अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होत असल्याने मोहिमेतील सर्वांना काम करण्यासाठी हुरूप आला आहे. तसेच विविध संघटना अभियानामध्ये जोडल्या जात आहेत. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी व सदस्य मागील तीन महिन्यांपासून पवनामाईला जलपर्णीमुक्त करण्यासाठी अविरत काम करीत आहेत. पवना नदीच्या उगमापासून ते पवना नदीच्या संगमापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेकडो ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे.

अभियानाला सुरुवातीपासून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानाला सुरुवात होणार आहे. असाच उत्स्फूर्त प्रतिसाद येत्या रविवारी (दि. 4) द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.