जाहिरात फलकाच्या सव्वाशे कोटीची थकबाकी उघडकीस : विधीमंडळात उमटले पडसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

होर्डिंग्ज व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न आमदार विजय काळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. पुणे महापालिकेचा परवाना आणि आकाशचिन्ह विभाग जाहिरात फलक आणि होर्डिंग्जच्या १२५ कोटीच्या थकबाकीबाबत अनभिज्ञ आहेत अशी धक्कादायक माहिती काळे यांनी उघडकीस आणली.

पालिकेच्या मुख्य लेखापरिक्षणाच्या अहवालात १७४९ जाहिराती फलकाच्या परवानाधारकांची १४२ कोटींची थकबाकी नमूद केली आहे. तर, आकाश चिन्ह विभागाने फक्त ३५ कोटीची थकबाकी असल्याचे म्हटले आहे ही विसंगती आमदार काळे यांनी निदर्शनास आणून दिली.थकबाकी वसुली आणि जाहिरात फलकाचे नवीन धोरण तत्काळ जाहीर करण्यात येईल असे आश्वासन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिले. पुणे महापालिकेत जाहिरात फलक आणि थकबाकी वादग्रस्त ठरलेली असताना त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यात मुख्यमंत्र्यांना अखेर हस्तक्षेप करावा लागला.