ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्यामुळे इंजिनियरचा मृत्यू

लोणी काळभोरः पोलीसनामा आॅनलाईन
कामावरुन घरी परतत असताना अवजड ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने इंजिनियर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे- सासवड राज्यमार्गावर घडली. वैभव नंदकुमार ऊबाळे (वय- 28,रा.हाडको, सासवड, ता. पुरंदर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा मोठा भाऊ विक्रम नंदकुमार ऊबाळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घरी परतत असताना इंजिनियर च्या दुचाकीला चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे तो खाली पडला. याचवेळी मागून आलेल्या अवजड ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्यामुळे तरुण जागीच मृत्यूमुखी पडला. वैभव हा होळकरवाडी ( ता. हवेली ) येथील कॉन्सुल निओव्हॅट या कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो कामावर जाण्यासाठी व येण्यासाठी दुचाकीचा वापर करत असे. घटनेच्या दिवशी वैभव हा क्रमांक (एमएच १२ केएम ६१०६) या गाडीवरुन घरी येत असताना मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या इंडिका (क्र.एमएच. १२. केएन. ८७१९) कारच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे वैभव दुचाकीसह रस्त्यावर पडला. याचवेळी हडपसर कडून सासवड कडे निघालेला अवजड ट्रक(एमएच १२ सीटी ८६६१ )या ट्रकच्या चाकाखाली वैभव आल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेस कारणीभूत असलेले इंडिका व ट्रक वरील अज्ञात चालक तेथे न थांबता आपापली वाहने घेऊन निघून गेले. परंतू दोन्ही वाहनांचे क्रमांक मिळाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहे.