डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक

पुणे : एनपीएन्यूज नेटवर्क

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पैसे परत करण्याच्या नावाखाली दिलेली वेळ न पाळणार्‍या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून त्यांना अटक केली असून, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारात दिल्लीत ही कारवाई केली.

डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती हे दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमध्ये होते.  काल सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली चार पथकं डीएसकेंना अटक कऱण्यासाठी रवाना झाली होती. ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डिएसके यांच्यासह पत्नी, हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात ते पैसे भरण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तयांचा अटकपूर्व जामीन अर्ज 22 फेब्रुवारीपर्यंत आदेशासाठी राखून ठेवला होता.  मात्र, डीएसकेंनी बुलडाणा बँकेला ज्या दिलेल्या मालमत्ता अगोदरच एका बँकेकडे तारण ठेवलेल्या असल्याचे सरकारी वकिलांनी गुरुवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले. त्या नंतर त्यांना शनिवारी पहाटे अरेस्ट करण्यात आली आहे.

डिएसके यांच्या विरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4000 तक्रारी अर्ज आले आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 284 कोटी 20 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी ही कारवाई केली.