तटरक्षक दलाच्या त्या’ जखमी वैमानिकाचे निधन

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन
तटरक्षक दलात वैमानिक म्हणून कार्यरत असलेल्या सहायक कमांडट कॅप्टन पेन्नी चौधरी यांचे १७ दिवसांच्या उपचारानंतर काल रात्री निधन झाले.रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील नांदगावजवळ १० मार्च रोजी तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात पेन्नी चौधरी जखमी झाल्या होत्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या पेन्नी चौधरी यांच्यावर नौदलाच्या दक्षिण मुंबईतील ‘आयएनएचएस’ अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काल रात्री पेन्नी चौधरी यांचं निधन झाल्याची माहिती तटरक्षक दलाचे पीआरओ (पश्चिम) कमाडंट अविनंदन मित्र यांनी दिली. कॅप्टन चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती मित्र यांनी दिली.

रेवदांडा-मुरुड मार्गावर नांदगाव असून १० मार्च रोजी दुपारी २.४० वाजता ही दुर्घटना घडली होती. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. डेप्युटी कमांडर बलवींदर सिंग, असिस्टंट कमाडंट चौधरी आणि आणखी दोन जण होते. अपघात अन्य तीन जणांना किरकोळ जखम झाली होती. तर पेन्नी चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.