तमाशात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी;देहूरोड येथील घटना

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन
देहूरोड परिसरातील मामुर्डी येथे नाचण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना रात्री दहाच्या सुमारास मामुर्डी येथील भैरवनाथ मंदिरा समोर झाली. याप्रकरणी प्रमोद राहुल गायकवाड यांनी देहू रोड पोलिसात फिर्याद दिली असून राजा राऊत, गोटू राऊत यासह सोळा जणांच्याविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप संशयितांना ताब्यात घेण्यात आले नाही. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”मामुर्डी गावात दोन दिवसांपासून भैरवनाथाच्या यात्रेचा जल्लोष आहे. या निमित्त लोकनाट्य (तमाशा)चे आयोजन करण्यात आले होते. रात्री लोकनाट्य सुरू झाले. प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती.अनेकांनी लावणीच्या संगीतावर ठेका धरला होता. फिर्यादी प्रमोद गायकवाड आणि त्यांचे मित्र मंडळी होते, तसेच राजा राऊत,गोटू राऊत त्यांचे मित्र देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

फिर्यादी गायकवाडचे मित्र नाचत असताना संशयित आरोपी राजा राऊत आणि गोटू राऊत यांच्या मित्रांमध्ये नाचण्यावरून धक्काबुक्की झाली त्याचे रूपांतर गटातील हाणामारीत झाले. यात फिर्यादी आणि राऊत यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. त्यानुसार प्रमोद गायकवाड यांनी सोळा जणांच्या विरोधात देहू रोड पोलिसात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.”