तमाशाला संकटमुक्त करून नवसंजीवनी द्या- मंगला बनसोडे 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

राज्याची प्रमुख लोककला असलेला तमाशा सध्या समस्यांच्या गर्तेत सापडला आहे, त्याला यातून बाहेर काढून पुन्हा नवसंजीवनी द्या, अशी आर्त साद ज्येष्ठ लावणी कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली आहे.

कलेची सेवा करण्यासाठी आणि लावणी कलावंत जगविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आम्ही तमाशा कला सादर करत आहोत. तमाशाच्या नावावर थिएटरमध्ये लावणीचे कार्यक्रम करणारे परदेशी वार्‍या करत आहेत. तमाशा मात्र जाग्यावरच राहिला आहे. नोटा बंदीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे असेही त्या म्हणाल्या. लावणीसाठी दिले जाणारे पुरस्कार वशिल्यावर दिले जातात, असा आरोपही मंगला बनसोडे यांनी केला आहे. यावेळी कलावंतांचे थकीत मानधन त्वरित मिळावे अशी मागणी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत शनिवारी मंगला बनसोडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते.