तृतीयपंथी असल्याने मॉल मध्ये प्रवेश नाकारला

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

-डॉल्फिन भाऊ

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी पुण्यातील विमाननगर येथील नगररोडवर फिनिक्स मॉल मध्ये गेलेल्या सोनालीला ‘तृतीयपंथी’ आहे, या कारणांमुळे तिची अडवणूक करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान फिनिक्स मॉल च्या व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी यापूर्वी आम्हाला तृतीयपंथी व्यक्तीकडून आलेल्या वाईट अनुभवामुळे आम्ही ही अडवणूक केल्याचे सांगितले.

फायनान्समध्ये एमबीए करणारी सोनाली ही आशीर्वाद नावाच्या एका एनजीओ मध्ये काम करते. गुरुवारी तिच्याबाबत घडलेल्या याप्रकाराबाबत तिला विचारले असता तिने सांगितले की, ‘मी माझ्या मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी फिनिक्स मॉलमध्ये खरेदीला गेले होते. मॉल मध्ये प्रवेश करीत असताना प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली. मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. त्या महिला सुरक्षारक्षकाने माझी हात न लावता तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता त्या महिला सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसी मध्ये तृतीयपंथीय व्यक्तींना प्रवेश न देण्याचे नमूद केले आहे. तुमची नियमावली मला दाखवा असे त्यांना विचारल्यानंतर व्यवस्थापनाने टाळाटाळ करून एक तास वाट पाहायला लावली. मात्र यासगळ्यात त्यावेळी मॉल मध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी सहकार्य केल्याचे सोनाली हिने सांगितले.

‘प्रश्न माझ्या निघून जाण्याचा नव्हता’. मी निघूनही गेली असते. मात्र प्रश्न हा आम्हा तृतीयपंथीयांचा होता. आज मला डावलले उद्या आमच्या आणखी एका सहकाऱ्याला देखील अशीच वागणूक मिळणार असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? हा प्रश्न सोनालीने उपस्थित केला. म्हणून मी मॉल मध्ये थांबल्याचे तिने सांगितले.

तिचा अवमान करण्याचा हेतू नव्हता…

आम्हाला तृतीयपंथीयाबाबत पूर्वी वाईट अनुभव आले होते. तसेच सुरक्षेसाठीच्या कारणास्तव आम्ही त्यांना थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. अशी प्रतिक्रिया मॉलचे व्यवस्थापक सी.पी.पोरवाल यांनी दिली.