पाणीबाटली व दुधाच्या पिशवीवर लागणार प्लॅस्टीक ‘कर’; सामान्यांना बसणार भुर्दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात गुढीपाडवा नविन वर्षापासून प्लास्टिक तसेच थर्माकोल वस्तूंवर बंदी घालतानाच पाण्याची बाटली आणि दुधाच्या पिशव्या, यांवर प्रत्येक बाटलीमागे एक रुपया आणि दुधाच्या पिशवीमागे आठ आणे छुपा ‘प्लास्टिक कर’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या सरकारी प्लास्टिकबंदीची खिल्ली समाजमाध्यमांवर उडवली जात आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत प्लास्टिकबंदीची घोषणा केली. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त २५ हजार रुपये दंडाची आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद शिक्षेत आहे. दुधासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया -पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच ५० पैसे भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यानंतर दुधाची रिकामी पिशवी किंवा पाण्याची रिकामी बाटली पुन्हा दुकानदाराकडे दिल्यानंतर हे अतिरिक्त पैसे परत मिळतील. मात्र या रिकाम्या बाटल्या-पिशव्या परत केल्या गेल्या नाहीत, तर पैसे वाया जाणार आहेत. त्याचप्रमाणे या रिकाम्या बाटल्या आणि पिशव्या परत घेऊन त्यांच्यासाठी आकारलेला जादा दर परत करणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. उत्पादित माल पुनर्प्रक्रियेसाठी पुन्हा आला नाही तर ही रक्कम सरकारजमा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीतर्फे दर तीन महिन्यांनी अंमलबजावणीचा आढावा घेऊन नियमनांमध्ये सुधारणा करण्यात येईल.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे अविघटनशील कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत सरकारला तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती देखील नेमण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र या बंदीमुळे प्लास्टिकचा वापर बंद होण्याऐवजी केवळ दरवाढीचा सर्वाधिक फटकाच सामान्य लोकाना बसणार असल्याने प्लास्टिकबंदीच्या या अजब निर्णयाचा नेमका हेतू काय, याबद्दल जनतेत शंकेचे सूर उमटत आहेत.