दोन्ही पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून ‘मी आत्महत्या करणार’

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन

”वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला मी आता कंटाळले आहे, त्यामुळे पोलिस ठाण्याच्या इमारतीवरूनच मी उडी मारून जीव देणार” अशा आशयाचा व्हॉट्सअॅप मेसेज वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या एका महिला पोलिस शिपाईने पोलिस ठाण्याच्या ग्रुपवर केल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. संबंधीत महिला शिपाईची तिच्या इतर साथिदार आणि घरच्यांनी समजूत घालून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

संबंधीत महिला कर्मचारी ही पोलीस शिपाई म्हणून परिमंडळ तीन मधील वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दैनंदीन बंदोबस्त ठरविणे, कोणाला कोठे ड्युटी लावली आहे त्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी या महिला शिपाईवर आहे. तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी-अधिकारी यांच्या सुट्टीचे आणि दैनंदीन कामाकाजाचे नियोजन ही महिला कर्मचारी करते.

पोलीस ठाण्यातील नोंद होणारे गुन्हे, पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना कामकाजाची माहिती मिळावी यासाठी सोशल मिडीयाचा वापर प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात येतो. तसेच काही ग्रुपमध्ये वरिष्ठ पोलीस अधिका-यांनाही त्यामध्ये समाविष्ट करण्यात येते. परंतु वरिष्ठांना ग्रुपमध्ये न घेता फक्त पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जातो. असाच एक ग्रुप वाकड पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला आहे.

ड्युटी लावण्यापासून ते अन्य अनेक कामावरून आयटीपार्कला जोडून असलेल्या वाकड पोलिस ठाण्यातील निरीक्षकांकडून संबंधित महिला शिपाईला जाब विचारला जात होता. त्यातूनच त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. त्यामुळे वैतागलेल्या महिला शिपाईने सोमवारी (१२ मार्च) दुपारी पोलिस ठाण्याच्या ग्रुपवर मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकला. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा मेसेज या महिला पोलिसने केला. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वाकड पोलीस ठाण्यात सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सतीश माने तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण हे कार्यरत आहेत.

पोलिसांच्या कामाच्या वेळा आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे पोलिसखाते कायमच चर्चेत असते. कामाच्या ताणातून आणि अपुऱ्या मनुष्यबळातून राकट पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात अनेकदा खटके उडत असतात. पण थेट आत्महत्या करीत असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आल्याने या महिला शिपाईला किती त्रास दिला असेल हेच या कृत्यावरुन समजते. महिलेने ग्रुप टाकलेल्या मेसेजची माहिती अवघ्या काही तासात शहर पोलिस दलात पसरल्याने पोलीस अधिका-यांची भांबेरी उडाली.

वाकड पोलीस ठाण्यातील इतर कर्मचा-यांनी या महिलेची समजूत घालून तिला आत्महत्येपासून प्रवृत्त केले. वरिष्ठांमुळे कर्मचा-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. तुर्तास तरी या वादावर पडदा पडल्याचे सांगितले जात आहे.परंतु या वरिष्ठ अधिका-यांवर अति वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार कि समज देऊन सोडून देणार हे येत्या काळात समजेल.