धंगेकरही विधानसभेसाठी धडक देण्याच्या तयारीत

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन 

राजेंद्र पंढरपुरे

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वर्ष, सव्वावर्षावर येऊन ठेपलेल्या आहेत. अर्थातच या निवडणुकीसाठीचे इच्छुक तयारीला लागले आहेत. लोकसभेसाठी भाजपत तीन इच्छुक आहेत. काँग्रेसमध्येही काही इच्छुक आपली नांवे पुढे करु लागले आहेत. पुण्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. तेथील विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार आपले अस्तित्व या ना त्या प्रकारे दाखवू लागलेत.

शहराच्या अगदी मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदार संघ हा पालकमंत्री बापट यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात बापट पुन्हा लढणार? की लोकसभेचे उमेदवार होणार? याचे कुतूहल आहेच. बापट यांच्यासमोर दोनवेळा लढत देणारे रविंद्र धंगेकर आता पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघात सर्वत्र शुभेच्छांचे फलक लावले असून त्यावर विधानभवनाचे छायाचित्र लावण्यात आले आहे. धंगेकर यांनी एकप्रकारे आपली उमेदवारीच जाहीर केली असून त्यांचे कार्यकर्ते या दृष्टीने कामाला लागले आहेत. याविषयी धंगेकर म्हणाले की ‘माझ्या कार्यकर्त्यांची ही मागणी आहे’.

वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत धंगेकर हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते. त्यांनी त्या निवडणुकीत भाजपचे बलाढ्य उमेदवार गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी प्रभागातील काँग्रेसच्या उमेदवारांनीही आपल्या प्रभागात धंगेकर हवेतच असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. त्यामुळे ती निवडणूक लक्षवेधी ठरली होती. धंगेकर यांनी पहिल्यांदा जेव्हा विधानसभा लढवली होती त्यावेळी बापटांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. कसब्यामध्ये काँग्रेस पक्षातही काही इच्छुक आहेत त्यामुळे धंगेकरांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता राहील. वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी निवडणूक रिंगणात उडी मारली असे म्हणता येईल.