धक्कादायक: गणित येत नसल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात कोंबली छडी

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन

गणित चुकल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबली. हा धक्कादायक प्रकार कर्जत येथे घडला. रोहन दत्तात्रय जंजिरे (रा. पिंपळवाडी, ता. कर्जत, वय ८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन जंजिरे याच्या अन्ननलिका व श्वसननलिकेस इजा झाली असून, त्याच्यावर पुण्यात रूबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत रोहनची आई सुनीता यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळवाडी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत रोहन दुसरीत शिकतो. शाळेचे काम सुरू असताना वर्गात रोहनचे गणित चुकले; त्याचा राग चंद्रकात सोपान शिंदे या शिक्षकाला आला. ‘तुला काहीच येत कसे येत नाही,’ असे म्हणून त्यांनी रागाने त्यांच्या हातात असलेली लाकडी छडी रोहनच्या तोंडात घातली. अचानक लाकडी छडी तोंडात घुसवल्याने रोहन जोरात ओरडला. मात्र, त्यामुळे त्याच्या अन्ननलिका व श्वासनलिकेला इजा झाली.

तोंडात इजा झाल्याने रोहनला बोलताही येईना. त्यामुळे त्याला प्रथम राशीन येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बारामती येथे नेण्यात आले. मात्र, तिथे डाँक्टरांनी रोहनची जखम गंभीर असल्याने त्याला पुण्याला नेण्यास सांगितले. यानंतर रोहनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर तालुका गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी पिंपळवाडी शाळेत जाऊन विद्यार्थी आणि इतर शिक्षकांचे जबाब घेतले आहेत. पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.