धमकी देऊन रियल एस्टेट एजंटकडे २५ कोटींची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जमीनीचे बनावट दस्तावेज तयार करुन जमीन ताब्यात घेण्याची धमकी देत एका रियल एस्टेट एजंटकडे २५ कोटींची मागणी केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी एकजण संरक्षण खात्याचे वकील आहेत.

इशराक खान, सुधीर कामत, अॅड. जी. आर. शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनिष हरेष मिलाणी (वय-39, रा. सिल्वर वूड, मुंढवा) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष मिलाणी यांचा रियल एस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांची लोहगाव येथे 69.23 एकर जमीन आहे. या जमीनी शेजारी संरक्षण खात्याची जमीन आहे. जमीनी संदर्भात संरक्षण खाते आणि मिलाणी यांच्या वाद न्यायप्रविष्ट आहे. संरक्षण खात्याचे वकिल अॅड. जी.आर. शर्मा आणि इशराक खान, सुधीर कामत यांनी मिलाणी यांना खोटे दस्तावेज तयार करुन ते न्यायालयात आणि पोलीस ठाण्यात सादर करुन जमीन ताब्यात घेऊ अशी धमकी दिली. तसेच इशराक खान आणि सुधीर कामत यांनी मिलाणी यांची भेट घेऊन बनावट कागदपत्र तयार केल्याचे दाखवले. खान याने इतरांच्या जमीनीचे खोटे दस्तावेज तयार केल्याचे दाखवून पैशांची मागणी केली. जमीन ताब्यात घेऊ नये यासाठी त्या तिघांनी मिलाणी यांच्याकडे २५ कोटींची मागणी केली.

पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे एन. एम. पवार करत आहेत.