नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करणार: मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण होईल. त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक धावपट्टी यांचा समावेश असेल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पामधील ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी संमतीने पुनर्वसन स्वीकारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५० लाख प्रवासी क्षमता असलेली टर्मिनल इमारत आणि एक धावपट्टी यांचा समावेश आहे. डिसेंबर २०१९ अखेर पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण होईल.