नागपुरात तरुणाचा भोसकून खून; दहा दिवसातील सातवी हत्या

 

नागपूरः पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील गोंडखैरीजमध्ये आज (दि.5 ) शनिवारी एका तरुणाचा तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. नंदू भोसले (वय-22) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, गोंडखेैरी येथील जिल्हा परिषदच्या आवारातील स्वच्छतागृहात हत्या करुन त्याचा मृतदेह टाकण्यात आला आहे. दहा दिवसातील शहरातील ही सातवी घटना असल्यामुळे शहरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या दहा दिवसात शहरात हत्येच सत्र सुरूच असल्यामुळे सभोवतालच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दहा दिवसात नागपुरात एकापाठोपाठ सात जणांची हत्या झाली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.