नारी के ‘सन्मान’ में ‘कोंढवा’ मैदान में

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

उन्नाव व कठुआ बलात्कार घटनेच्या निषेधार्थ कोंढव्यातील सर्व धर्म, जाती – पाती, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यावतीने आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या आक्रोश रॅलीमध्ये सात ते आठ हजार नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि मुली यांचा सहभाग लक्षणीय होता.

कोंढवा येथील कोणार्क पुरम मॉल ते ज्योती हॉटेल चौक या दरम्यान रॅली काढण्यात आली होती. रॅलीतील सहभागी असलेल्या सर्वांनी हातावर काळी फीत लावून आपला निषेध नोंदवला. अनेकांनी आपल्या हातात काळे झेंडे घेतले होते. रॅली ज्योती हॉटेल चौकात आल्यावर अफिया जावेद शेख, अलिजा जावेद शेख, उमेरा अफसर शेख या लहान मुलींनी मंचावर केलेल्या भाषणात या दोन्ही बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

उन्नाव व कठुआ येथील बलात्कारांची प्रकरणे लक्षात घेतली तर सध्याचा स्वातंत्र्योत्तर भारतातील एक काळा कालखंड सुरू आहे असे म्हणायला हरकत नाही, अशी टीका ४९ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली असून त्यात मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर भारतातील हा काळा कालखंड असून राजकीय पक्ष, नेते व सरकार यांचा अशा घृणास्पद घटनांना दिलेला प्रतिसाद पुरेसा तर नाहीच, शिवाय तो क्षीण आहे. एकूण ४९ माजी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या पत्रावर असून त्यात पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर, प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो, माहिती अधिकार कार्यकर्त्यां अरूणा रॉय व माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला यांचा समावेश आहे.

यावेळीं माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर व नगरसेवक प्रशांत जगताप, पुणे मनपा मनसे गटनेते वसंत मोरे, वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय अध्यक्ष हाजी गफूर पठाण, नगरसेवक साईनाथ बाबर, नगरसेविका परवीन फिरोज शेख, नंदा लोणकर, हमीदा सुंडके, माजी नगरसेवक नारायण लोणकर, रईस सुंडके, अनिस सुंडके, हाजी फिरोज शेख, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष हसीना इनामदार, जाफर खान, मजहर मणियार, अफझल पठाण, बसित शेख, जाहित शेख, जाहिद ,नावेद शेख, अमजद पठाण, इम्तियाज शेख, फरीद शेख, अनवर मेमन व नागरिक उपस्थित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल आगवण यांनी केले. रॅलीत लहान मुलींची भाषणे झाल्यावर दोन मिनिटांचे मौन बाळगले गेले व त्यांनतर राष्ट्रगीताचे गायन सर्वांनी केले. रॅलीसाठी कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड व त्यांच्या सहकारी तसेच कोंढवा वाहतूक शाखेच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.