नाशिकमध्ये तरुणीचा चेहरा ठेचून निर्घृण खून

नाशिकः पोलीसनामा ऑनलाईन

घरात स्वयंपाक करणार्‍या 19 वर्षीय तरुणीच्या तोंडावर दांडक्याने किंवा दगडाने प्रहार करून अज्ञातांनी तिची निर्घृण हत्या केली. ही घटना त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील विनायकनगरमध्ये असलेल्या गणेशगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

रंजना चंदर महाले (वय 19, रा. विनायकनगर, गणेशगाव, ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. काल (दि. 23) रंजना महाले घरात एकटी होती. तिची आई कुठे तरी बाहेर गेली होती. 19 वर्षीय रंजना ही घरात स्वयंपाक करीत असताना सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास अज्ञात लोकांनी तिच्या घरात येऊन तिच्या तोंडावर दगड किंवा लाकडी दांड्याने जबर प्रहार करून तिची हत्या केली. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत तीचा जागीच मृत्यू झाला.

अचानक घरातून ओरडण्याचा आवाज आल्यामुळे आजूबाजूचे नागरिक येथे जमले मात्र अगोदरच संशयित मारेकरी पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रंजनाची अतिशय क्रूर पद्धतीने चेहरा विद्रूप करून हत्या करण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती तत्काळ त्र्यंबकेश्‍वर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलाचे व त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येचे कारण समजले नसून, अज्ञात मारेकर्‍यांची माहिती मिळालेली नाही. त्र्यंबकेश्‍वर पोलिस आता संशयितांच्या शोधासह तिच्या हत्येचे कारण आणि तिच्यावर काही अत्याचार करण्यात आले का या दृष्टीने तपास करीत आहेत. त्र्यंबकेश्‍वर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास त्र्यंबकेश्‍वर पोलिस करीत आहेत.