नैराश्यावरील उपचारासाठी द्राक्ष लाभदायी!

आरोग्यासाठी विविध प्रकाराच्या फळांचे सेवन आवश्यक असते. यापैकी रसाळ, मधुर द्राक्ष न आवडणारी व्यक्ती अपवादानेच सापडावी. रसाळ स्वाद असलेले फळ आवडणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. द्राक्ष केवळ स्वादिष्ट नसून, नैराश्यावरील उपचारांसाठीही अतिशय लाभदायी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नैराश्यावरील उपचारपद्धतीत द्राक्षांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक संयुगांच्या माध्यमांतून या आजाराच्या नव्याने समोर आलेल्या कार्यप्रणालीला लक्ष्य केल्यास मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असा संशोधकांचा दावा आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झाले आहे. अमेरिकेच्या माऊंट सिनाइ येथील ‘इकन स्कूल ऑफ मेडिसीन’मधील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात डिहाइड्रोकाफीक अॅसिड (डीएचसीए) आणि मॅलव्हिडिन -३ ‘ओ-ग्लूकोसाइड (मॅल-ग्लूक) यांसारखी संयुगे नैराश्यावरील उपचारांसाठी फायदेकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नैराश्यावरील सध्याच्या पारंपरिक उपचारपद्धतीत केवळ ५० टक्के रुग्णांचा आजार कमी करण्यात यश येत असल्याचे समजते. यातही अनेक रुग्णांवर उपचाराचे प्रतिकूल परिणाम होताना आढळतात. त्यामुळे या आजारावर तत्काळ व्यापक उपचारपद्धतीची आवश्यकता असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.