न्याय द्या, अन्यथा आत्महत्या करु, धर्मा पाटलांच्या पत्नीचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन
लवकर न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा सखुबाई धर्मा पाटील यांनी दिला आहे. महिला दिनाच्या दिवशी सखुबाई यांनी पतीच्या अस्थीचा कलश घेत, मुलगा नरेंद्र पाटील सोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि निवेदन दिले.

शासन दरबारी चकरा मारुनही न्याय मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथील 84 वर्षीय धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करुन स्वतःची जीवन यात्रा संपवली होती. या घटनेला दीड महिना होऊन सुद्धा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही.

आज सखुबाई जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या परंतु जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे नसल्याने सखुबाई यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देत शासनाच्या चालढकल कारभाराचा निषेध केला. न्याय मागण्यासाठी पतीला जीव गमवावा लागला, असं बोलताना सखुबाई पाटील यांचे अश्रू अनावर झाले होते.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन मान्य नसल्याचं सखुबाईंनी यावेळी सांगितलं. सरकारने दिलेली 48 लाखांची मदतही मान्य नसल्याने योग्य न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला. ढिम्म कारभार असलेल्या सरकारला आतातरी जाग येऊन पाटील यांना न्याय मिळणार आहे का ? अशी जनभावना निर्माण झाली आहे.