पंढरपूर मधील नगरसेवकाच्या खूनाचा सांगलीत रचला कट

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट सांगलीत शिजल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुनातील मुख्य संशयित बबलू सुरवसे याच्या सांगलीतील दोन साथीदारांना सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. यातील ओंकार जाधव अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ओंकार नंदकुमार जाधव (वय 22, रा. हिराबाग कॉर्नर, सांगली) , प्रथमेश चंद्रकांत लोंढे (वय 22, रा. पी. आर. पाटील मार्ग, सांगली), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पवार यांच्या खूनप्रकरणी ठाणे पोलिसांनी बबलू सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ यांना अटक केली होती. त्यानंतर पंढरपूर पोलिसांनी आकाश बुराडे, लल्ल्या ऊर्फ रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे यांनाही अटक केलेली आहे.

या दरम्यान सोलापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवार दि. 19 रोजी सांगलीत छापे टाकून बबलूच्या नातेवाईकांकडे चौकशी केली होती. तसेच त्याच्या मित्रांबाबतही चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी ओंकार जाधवला अटक करण्यात आली. तर शुक्रवारी प्रथमेश लोंढेला अटक करण्यात आली. सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्याकडे तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली. पंढरपूरच्या या खुनाचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचले आहेत.

बबलू सांगलीत वास्तव्यास असताना त्याची येथील स्थानिक युवकांशी मैत्री झाली होती. पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट बबलूसह सर्व साथीदारांनी सांगलीतच रचल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटात प्रथमेश लोंढे आणि ओंकार जाधव सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सांगलीत कट रचल्यानंतर सर्व संशयित खुनाच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे गेले होते अशी कबुली लोंढे आणि जाधव यांनी दिली आहे. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे निरीक्षक कुंभार यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात सांगलीतील आणखी काही जणांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नगरसेवक पवार यांच्या खून प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती. ठाणे, सोलापूर आणि पंढरपूर पोलीसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या तरी या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.