कराड तालुक्यातील गमेवाडी गावच्या सुनेची यशोगाथा

उंब्रजः पोलीसनामा आॅनलाईन
जात जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर तुम्ही असाध्य गोष्ट देखील साध्य करु शकता. याचा आदर्श घालून दिला आहे कराड तालुक्यातील गमेवाडी गावच्या सुनबाई शितल घाडगे यांनी. नुकतीच शितल घाडगे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून सहायक मोटार वाहक निरीक्षक पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना पंधरा दिवसाचे लहान बाळ असताना देखील अभ्यास व घर सांभाळत त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन काैतूक होत आहे.

सातवीमध्ये शिक्षण घेत असताना आईचे क्षत्र हरवले. वडिलांनीच आई बनून मुलीचा सांभाळ केला. शितलचे वडील शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरुक होते.”ते म्हणायचे जमिनीचा एखादा तुकडा विकायची वेळ आली तरी चालेल पण शितल तू खूप शिकायला हवे .वडिलाच्या या जिद्दीची प्रेरणा घेत शासनाकडून मिळालेल्या सायकलवर शितल उंब्रजला शाळेला येत होती. बारावी झाल्यानंतर शितलने साताऱ्यामध्ये ‘डिप्लोमा अॅटोमोबाईल इंजिनिअरिंग’ला प्रवेश घेतला. शितलच्या अोळखीच्या प्राध्यापिका स्पर्धा परिक्षा देत होत्या. त्यावेळी त्यांनी शितल घाडगे यांना स्पर्धा परिक्षेची माहिती दिली. शितलचा डिप्लोमा पुर्ण झाल्यानंतर पदवीसाठी शितलने कराड येथे प्रवेश घेतला. याच वेळी शितलचा गमेवाडीच्या निलेश जाधव यांच्याशी विवाह झाला. पदवीचे शिक्षण घेत असताना दोघांना आरोही नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. आरोही अगदी पंधरा दिवसाची असताना शितल परीक्षेसाठी काॅलेजमध्ये जात होती. त्यावेळी घरी पती निलेश व नणंद
विद्या आरोहीचा सांभाळ करत असत. शितलने स्पर्धा परीक्षेची तयारी कराडच्या विद्या प्रबोधनीमध्ये केली आहे. पत्नीने मिळविलेल्या या यशाचा पती निलेश यांना देखील सार्थ अभिमान आहे.

इंजिनिअरिंगची परीक्षा व स्पर्धा परीक्षेची मुख्य परिक्षा या दोन्ही परीक्षेमध्ये अल्पावधीचा कालावधी असताना देखील शितलने जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर हे दुहेरी यश संपादन करत ती एकाच वर्षात अारटोअो व अभियंता बनली आहे.

”सातारा येथे शिक्षणासाठी असताना पास काढायला कधी कधी वडिलांकडे पैसे नसायचे. इतरांकडून उसने पैसे आणून ते मला पास काढण्यासाठी देत. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मला शिक्षण दिले. जेव्हा आपल्यावर जबाबदारी जास्त येते तेव्हाच कर्तव्य सिद्ध करण्याची जास्त जाणीव होते. तेव्हा स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांनी परिस्थितीशी संघर्ष करावा. प्रामाणिकपणे मनलावून अभ्यास केला तर यश मिळते.”

शितल घाडगे,जाधव