काँग्रेस नेते डॉ.पतंगराव कदम यांचे निधन

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पश: आजाराने आज दुःखद निधन झाले. डॉ.कदम हे मागील काही दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृती स्थिर असतानाच आज अचानक प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

शनिवारी (10 मार्च) सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील राहत्या घरी पतंगराव कदम यांचं पार्थिव आणलं जाईल. त्यानंतर सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी (10 मार्च) संध्याकाळी 4 वाजता वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी होतील .

डॉ. कदम हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. डॉ. कदम हे विधानसभेवर सात वेळा निवडून आलेले होते. त्यांनी वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्रीपदी आघाडी सरकार मध्ये काम पाहीलेले होते. डॉ.कदम यांच्या अचानक जाण्याने राज्याचे तसेच काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. कदम यांची सुसंस्कृत तसेच शांत स्वभाव आणि मुत्सद्दीपणा , जाणकार तसेच अभ्यासु नेता अशी ओळख होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक जनहिताचे निर्णय घेतले होते.

डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठाचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील होते. नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशन यांची महाविद्यालये स्थापन केली आहे. त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

सांगली जिल्हयातील सोनसळ या खेडेगावात एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा १९४५ साली जन्म झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. लहानपणापासून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी ध्येयांच्या पायर्या गाठल्या होत्या. समाजकारण,राजकारण, शिक्षणसम्राट ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहीला आहे.त्यांनी शिक्षणाबरोबरच उद्योग क्षेत्रातही मोठी कामगिरी बजावलेली आहे. डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक यांसह अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत. डॉ. कदम यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, सून,भाऊ असा परिवार आहे.