पतंगराव कदम यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबईः पोलिसनामा आॅनलाईन

माजी मंत्री श्री पतंगराव कदम यांच्या निधनाने आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पतंगरावांच्या निधनाने एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या गावांतून एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. तसेच शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 5 ते 6 कि.मीचा प्रवास करावा लागत असे. आपल्या बालपणीच्या या व्यथांची आठवण ठेवत त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण मिळावे, याची सोय केली. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील. नवनव्या प्रगत शैक्षणिक संकल्पना जाणून त्याचा आपल्या संस्थांमध्ये कृतीशील अवलंब करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. राज्य मंत्रिमंडळातही उद्योग, सहकार आदी महत्वाच्या विभागांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यांचे कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकिय यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा लिलावती रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.