पारधी समाजाच्या जागृती मेळाव्याचं आयोजन

पुणेः पोलिसनामा आॅनलाईन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पारधी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पारधी समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवुन देत पारधी समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जातपंचायत कायद्याची माहिती पारधी समाजाला सांगण्यात आली. या मेळाव्यात महिलांच्या समस्यांवर चर्चा घडवून आणली आणि त्या क्षेत्रातील मान्यवारांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांची माहिती पारधी समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे असते. ही माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे काम या मेळाव्यात करण्यात आले.

पारधी समाज हा अत्यंत मागासलेला व वंचित समाज आहे. शिक्षणाचे प्रमाण हे अत्यंत तुरळक असल्या कारणाने या समाजाची प्रगती होत नाही. या समाजात शिक्षण नसल्यामुळे व गरिबीमुळे हा समाज विकासापासुन कोसो दुर राहिलेला आहे. पारधी समाजातील बहुतांशी लोकांना राहायला जागा नाही, घर नाही, उद्योगधंद्याची साधने नाहीत, नोकर्‍या नाहीत, जातीची दाखले, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला नसल्या कारणामुळे त्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असणार्‍या शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. कारण, त्यांच्या पर्यंत या योजना पोहचत नाहीत आणि  हे पारधी लोक ही तिथपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळेच या सर्व गोष्टींवर चर्चा होण्यासाठी व त्यांच्यासाठी असणार्‍या योजनांची माहिती पारधी समाजाला मिळावी या हेतुने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पारधी समाजाचे शिक्षण, जातपंचायत, आरोग्य, पारधी विकास आराखडा, शासकीय योजना, व महिलांचे प्रश्न या विषयावर पारधी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व इतर लोक उपस्थित होते. या मेळाव्याचा मुख्य उद्देश पारधी समाजाचे विविध प्रश्न शासनासमोर मांडुन ते प्रश्न सोडवणे हा होता.

या कार्यक्रमात शिरूरचे पोलीस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांनी पारधी समाजास मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इकोनेट संस्थेचे जितेंद्र कठाळे यांनी पारधी समाजातील मुला – मुलींसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे पारधी समाजातील लोकांना सांगितले. त्यानंतर फासे पारधी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी पारधी समाजात असणारी जातपंचायत व बालविवाह या विषयावर बोलले. या मेळाव्यात तहसिलदार रंजन भोसले यांनी पारधी समाजाचे जातीचे दाखले, शबरी घरकुल योजना, रेशन कार्ड व आधार कार्ड चे पश्न लवकरात लवकर कॅम्पच्या माध्यमातुन सोडवू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात सर्व शासकीय अधिकार्‍यांना पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 या कार्यक्रमात करण्यात आलेल्या मागण्या 

१) शाळेत जाणार्‍या मुलांचे व सर्व सामांन्य पारधी समाजातील लोकांचे जातीचे दाखले कॅम्प घेवुन देण्यात यावेत.
२) रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे कॅम्प घेवुन देण्यात यावेत.
३) राहत्या घराखालील जागा नावे कराव्यात.
४) शबरी घरकुल योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या मार्फत आदिवासी पारधी समाजास या योजनेअंर्तगत घरे देण्यात यावीत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रियांका जाधव यांनी पारधी समाजाच्या समस्या शासकीय अधिकार्‍यांच्या समोर मांडल्या व त्या लवकरात लवकर सोडविल्या जाव्यात याची मागणी तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी यांना केली. क्रांती संस्थेच्या अध्यक्ष सुनिता भोसले यांनी पारधी समाज कसा मागासलेला व सर्व शासकीय योजनांपासुन कसा दुर आहे याची माहिती शासकीय अधिकार्‍यांना दिली. या कार्यक्रमासाठी इकोनेट संस्थेचे राहुल साळवी, आदिवासी फासे पारधी समाज संघटनेचे कार्यकर्ते, दैनिक जागरणच्या पत्रकार उमा, श्रीराम श्रीनिवासन, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिंदे साहेब, कक्ष अधिकारी राजेश खंदारे, महिला साहाय्यक कक्ष्याच्या अध्यक्ष शोभना ताई पाचंगे, क्रांती संस्थेचे कार्यकर्ते जितेंद्र काळे, मयुर चव्हाण, रेणुका काळे, फाल्गुण भोसले, कोमल काळे, विजय भोसले आदी उपस्थित होते.