पार्किंग धोरण भाजपकडून बहुमताच्या जोरावर मंजूर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

स्थायी समिती मध्ये बहुमताच्या जोरावर पार्किंग धोरण मंजूर करणारा सत्ताधारी भाजप पक्ष, पार्किंग धोरणाला सर्वस्तरातून विरोध होऊ लागल्याने बॅकफूटवर गेला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा व या समितीने सहा महिन्यात अहवाल देण्याची उपसुचना दिली. एवढेच नव्हे तर त्यानंतरही फक्त पाच रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवायचे सूचित केल्याने हे धोरण सत्ताधाऱ्यांना गुंडाळायला लागणार असेच चित्र आहे.

प्रशासनाने संपूर्ण शहरातील १८०० km रस्त्यांसाठी पार्किंग धोरण तयार केले होते. रस्त्यावर दिवसरात्र पार्किंग साठी पैसे आकारणी केली होती. नुकतेच झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या दरांमध्ये ८० टक्के कपात करून ती मान्य करण्यात आली. आज सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. यावरून मागील तीन दिवसांपासून विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी भाजप विरोधात रान पेटविले होते.

दरम्यान, गुरुवारी रात्री महापौर बंगल्यावर झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी ‘पे अँड पार्क’ ला विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर आज सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रस्ताव चर्चेला आला त्यावेळी भाजपने थेट महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, पदाधिकाऱ्यांची समिती नेमायची. या समितीने सहा महिन्यात अहवाल द्यायचा. सध्याची पार्किंगची अवस्था आणि क्षमता, विकास आराखड्यातील पार्किंगच्या जागांचे बीओटी तत्वावर विकसन करावे, रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेसाठी पार्किंग शुल्क आकारू नये, शहरातील पाच रस्ते निवडून त्याठिकाणी प्रायोगिक तत्वावर ‘पे अँड पार्क’ राबवावे आणि त्याचा आढावा घेऊन सर्व शहरात या धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी उपसूचना दिली.

भाजपच्या या पावित्र्याने भाजप पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे असेच म्हणावे लागेल. तर तुलनेने संख्येने कमी असलेल्या भूमिकेचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.