पार्थ पवारांनी पुन्हा घेतली आजोबांविरोधात भूमिका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षण लागू न केल्यामुळे अनेक पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचे पुत्र पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे. आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागे होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवे, असे ट्वीट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन छत्रपती राजे खासदारांनी केंद्र सरकारकडून आरक्षण मिळवून द्यावे असे वक्तव्य केले होते. मात्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे ट्वीटमुळे सिद्ध झाले आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तरुणाने आत्महत्या केली. त्यावर पार्थ यांनी ट्वीट केले आहे. ’विवेक सारखी तरुण मुले आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागे होऊन तत्काळ आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवे.

मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना जीव गमवावा लागू शकतो. असे पार्थ यांनी म्हटले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांवर बोट दाखवत पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात भूमिका घेतली आहे. याआधी राम मंदिर, जय श्रीराम नारा देताना पार्थ पवारांनी घेतल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती.