पाळीव प्राण्यांची हौस असेल तर पालिकेकडे पाच हजार भरा

सांगली :पोलिसनामा ऑनलाइन
श्‍वान पाळण्याची हौस आता वर्षाला पाच हजार रुपयांना पडणार आहे. सांगली महापालिकेच्या शुक्रवारच्या (ता.20) महासभेत याबाबतच ठराव होणार असून त्यात ‘श्‍वान पालकाला वार्षिक शुल्क आकारणी’चा विषय समाविष्ट केला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांची पैदास पालिकेला रोखता येत नाही. मात्र आता जी मंडळी कुत्री पाळणार आहेत त्यांना मात्र आता पालिकेकडे त्याचे पैसे मोजावे लागणार आहे.

शहरातील हजारो कुत्री त्यांच्या नसबंदीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. किती नसबंदी झाली याचा हिशेब लावण्यात महासभेचा वेळ जातो. आरोग्य विभागासाठी आता आणखी एक कुरण खुले होत आहे.तुमच्या घरात जर पूर्वी पासून एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याची पालिकेकडे नोंद बंधनकारक केली होती. मात्र त्याला चांगला प्रतिसाद न आल्याने आता मात्र या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. आता प्रशासनाने त्यासाठी नोंदणीबरोबरच पाच हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने मालकांना श्‍वानाच्या खबरदारीचीही जाणीव होईल हा यामागचा हेतू असल्याचे प्रशासनाचे मत आहे.