पाळीव प्राण्यांसाठी परवानगी लागणार

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन

मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या पुणे शहरामध्ये पाळीव प्राण्याची प्रामुख्याने कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळणा-या पुणेकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शहरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी वैयक्तिकरीत्या पाळले जातात, याबाबत या प्राण्याचे पालनपोषण करताना नागरिकांनी किती प्राणी पाळावेत, याचे काहीही नियम सध्या अस्तित्वात नाहीत. गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागांत वस्तीभाग, अपार्टमेंट, सोसायट्या, बंगले येथे एक-दोनपेक्षा अधिक पाळीव प्राणी असणारी लाखो कुटुंबे आहेत. परंतु, या प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे.

या पाळीव प्राण्यांवरून शहरामध्ये काही सोसायट्यांत मोठे वाददेखील निर्माण झाले आहेत.यामुळे पुणे शहरात पाळीव प्राण्याबाबत नियमावली करण्याची मागणी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा करून महापालिकेच्या रहिवासी भागांमध्ये वैयक्तिकरीत्या किती व कोणते प्राणी पाळावेत, याबाबात स्वतंत्र धोरण व नियमावली बनविण्यासाची कार्यवाही सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.