पिंपरी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रॉय यांचेवर एट्रोसिटी दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

पिंपरी। पोलिसनामा ऑनलाइन

बनावट संस्थेचे “लेटरहेड’ बनवून त्याद्वारे फिजिशियन डॉ.शंकर जाधव यांचा बदनामीकारक मजकूर समाजात पसरवल्याने महापालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत, तर डॉ. हेमंत चिखलीकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी-चिंचवड परिमंडल तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील फिजिशियन डॉ. शंकर जाधव यांना “वायसीएम’ रुग्णालयाच्या उपवैद्यकीय अधीक्षकपदावर पदोन्नती देण्यात येणार होती. परंतु, महापालिकेतील डॉ. हेमंत चिखलीकर यांनी जाधव यांना पदोन्नती मिळू नये. याकरिता बनावट “लेटरहेड’चा वापर करुन त्यावर खोट्या व बिनबुडाचा मजकूर लिहून ते पत्र 19 डिसेंबर 2015 महापालिका आयुक्तांना देण्यात आले. तसेच, सदरील बनावटी “लेटरहेड’ आणि त्यातील मजकूर हा पुढे महापालिका वैद्यकीय विभागाच्या “ई-मेल’ पत्यावरुन सर्व हॉस्पीटलमध्ये पसरवला. त्यामुळे डॉक्‍टर हेमंत चिखलीकर यांनी माझी बदनामी करुन मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार डॉ. जाधव यांनी तत्कालीन आयुक्तांकडे दिली होती.

तसेच, बोगस संस्थेचे बनावट “लेटरहेड’ बनवून त्याद्वारे बदनामीकारक मजकूर समाजात पसरवला होता. याबाबत डॉ. जाधव यांनी चिंचवड पोलीस स्टेशनला सदरील तक्रार दाखल केली. होती. तसेच, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या ठिकाणी न्याय मिळत नसल्याने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयान दिलेल्या आदेशात डॉ. हेमंत चिखलीकर यांच्यावर 166, 420, 500, 504, 506, 34 आणि डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पिंपरी-चिंचवड परिमंडळ तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्‍तांना आदेश देवून 156 अंतर्गत चौकशी करुन 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.