पुणे पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

पुणे महापालिकेच्या मुंढवा येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली. माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन झाले त्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हा विजय मिळाला. हा पक्षही संघटीतपणे ह्या निवडणुकीत उतरला त्यांना काँग्रेसनेही चांगली साथ दिली. त्यामुळे विजय सोपा झाला. राष्ट्रवादी ने आपला गड राखला एवढ्यापुरताच या निकालाचा अर्थ सिमीत रहात नाही. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर, भाजप तिसऱ्या क्रमांकावर गेला. भाजपसाठी ही नामुष्की म्हणावी लागेल.

राज्यात आत्ता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसतय. राष्ट्रवादी च्या हल्लाबोल यात्रेतही भाजप बरोबर शिवसेनेला लक्ष्य केलं जातय. आगामी काळात हे दोन पक्षच ग्रामीण भागात प्रमुख पक्ष म्हणून आमनेसामने येतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यादृष्टीने मुंढव्याच्या आत्ता झालेल्या निवडणुकीकडे पहावे लागेल. येथे शिवसेनेनी दोन नंबरची मते मिळवली. भाजप तिसऱ्या क्रमांकावर गेला. मुंढव्यातील शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांचाही मते वाढविण्यात मोठा सहभाग आहे. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागात भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता ही बाबही लक्षात घ्यावी लागेल.

भाजपकडे निवडणूक जिंकण्याची यंत्रणा (मशिनरी) आहे असा दावा केला जातो. पण ही यंत्रणा मुंढव्यात उपयोगी ठरली नाही. मतदानाची टक्केवारी वाढविण्यातही पक्षाला अपयश आले. भाजपच्या बुथ कमिट्या सज्ज आहेत असा दावा करण्यात येतो पण, मुंढव्यात हा दावा फोल ठरलेला दिसतो. शिवाय पाणी, प्रदूषण, कचरा विल्हेवाट असे स्थानिक विषय येथे होते त्यावर उपाययोजना करणे भाजपला जमले नाही असेच या निकालाने स्पष्ट होते. भाजपच्या स्थानिक आमदारांसाठीही ही निवडणूक सावधगिरी चा संदेश देणारी आहे. पुण्यात भाजपकडे प्रचंड राजकीय ताकद आहे. पक्षाकडे आठ आमदार, तीन खासदार आणि ९८ नगरसेवक एवढा मोठा राजकीय ताफा आहे. येथील पोटनिवडणुकीत पालक मंत्री बापट यांनी स्वतः लक्ष घातले होते. त्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. आपली ताकद पणाला लावली होती. मुंढव्यातील निवडणुकीची पार्श्वभूमी पहाता राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल हा अंदाज राजकीय वर्तुळात होता. परंतु भाजपचे तिसऱ्या क्रमांकावर जाणे धक्कादायक मानले जाते. लोकसभा निवडणुकीचे वारे वहात असताना भाजपला या पराभवाने अंतर्मुख व्हावे लागेल असे म्हणता येईल.