पुणे महापालिका प्रशासनाकडून सुचवलेली मिळकतकर वाढ एकमताने फेटाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने आगामी वर्षांसाठी १५ टक्के मिळकत करवाढ सुचविण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये एकमताने फेटाळण्यात आल्यानंतर त्या विषयावर खास सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आज झालेल्या मिळकतकर वाढी बाबत घेण्यात आलेल्या खास सभेत एक मताने पुन्हा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. सभागृह नेते म्हणाले की,”पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने मिळकत कर वाढ करण्यात आली नसून इतर स्रोतच्या माध्यमातून निधी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. सताधारी भाजपला महापालिकेचे उत्त्पन्न वाढविण्यात अपयश आले असून त्यांनी मिळकत करात आणलेली वाढ फेटाळण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे विरोधकांनी सांगितले.यामुळे सताधारी विरुध्द्व विरोधक असे एक प्रकारे युद्ध पाहावयास मिळाले.

पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मिळकत कराच्या प्रस्तावा बाबत महापालिकेच्या खास सभेत दीर्घ काळ चर्चा करण्यात आली. या विषयी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले की, शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या करवाढीला सामोरे जावे लागू नये असे धोरण शिवसेनेचे आहे.त्यामुळे मिळकतकर वाढीला शिवसेनेने विरोध दर्शवला असून महापालिकेने मिळकत कराततून उत्पन्न वाढीचा विचार करण्यापेक्षा इतर स्रोताचा विचार करावा.अशी मागणी देखील त्यांनी केली.
या विषयी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की,मिळकतकरात वाढ करण्याचा प्रस्ताव सभागृहात आल्यावर प्रशासनाला अभय योजनेतून किती उत्पन्न मिळाले.याचा खुलासा मागितला असता त्यावर प्रशासनाला काहीही खुलासा न आल्याने यावरून प्रशासनाचा कारभार दिसून येत आहे.त्यामुळे येत्या काळात आम्ही कोणत्याही परिस्थिती पुणेकर नागरिकांवर कर वाढ लादू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की,सताधारी भाजप ला महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी इतर स्रोत वापरता आले नाही.हेच त्यांचे अपयश आहे.ते आता पुणेकर नागरिकांवर करवाढ करण्याच्या प्रयत्नात होते.मात्र आम्ही सर्वानी करवाढला विरोध केल्याने पुणॆकर नागरिकांची करवाढ टाळल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले की,पुणेकर नागरिकांवर कोणत्याही परिस्थिती करवाढ करणार नव्हतो.म्हणूनच करवाढ होता कामा नये.अशी भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.तर विरोधक नेहमीच सताधारी पक्षावर टीका करण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.