पुणे विद्यापीठातील उपोषण सुरूच; विद्यार्थी न्यायाच्या प्रतिक्षेत 

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिंहगड शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषनाची ८ दिवसानंतरही बेदखल सुरु असून विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील ८ दिवसापासून विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र मागील ३ दिवसापासून साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रूपांतर करण्यात आले आहे.

सिंहगड शिक्षण संस्थेतील प्राध्यापक मागील १६ महिन्यापासून पगार न झाल्याने संपावर आहेत. त्यामुळे हजारो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासन आणि सरकार संबधित प्रकरण गांभीर्याने हाताळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची चिंता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना काहीतरी मार्ग काढून उपाययोजना करू असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, ८ दिवसांनंतरही परिस्थिती जैसेथेच असल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. विद्यापीठाकडून ठोस असे कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याने उपोषण न थांबवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत मरण आले तरी उपोषण मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

दोन महिन्यांपासून लेक्चर्स बंद असल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. लेक्चर्स पूर्ववत घेतल्यास अभ्यासक्रम लवकर पूर्ण होईल तसेच ६ मार्च पासून सुरु होणारी परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलावी. उपोषणादरम्यान काही विपरीत घडल्यास त्याला पूर्णपणे सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल. – उपोषक विद्यार्थी – नसरुद्दिन सय्यद

या विषयीच्या विद्यापीठ अख्त्यारीत सर्व त्या कार्यालयीन बाबी विद्यापीठाकडून पूर्ण केल्या आहेत. येत्या २८ तारखेपर्यंत संस्थेला कार्यवाहीसाठी वेळ दिली असून त्यांनतर संस्थेवर योग्य ती कारवाई केली जाईल.
– डॉ.अरविन्द शाळीग्राम (प्रभारी कुलसचिव)