पुणे विद्यापीठात एनएसयूआय आणि सुरक्षा रक्षकात बाचाबाची; शहीद दिनावरून वाद

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनावरून भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षक यांच्यात बाचाबाची झाली. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन जवळ शहीद दिन साजरा करताना अडवल्याचा आरोप एनएसयूआयच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केला आहे.

विद्यापीठात एनएसयूआय कडून अनिकेत कॅन्टीन जवळ शहीद दिन साजरा करत असताना सुरक्षा रक्षकांकडून कार्यक्रमात व्यत्यय आणला गेला. यामुळे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये व सुरक्षारक्षक यांच्यात चांगलीच शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी हे विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेरचे असल्याच्या संशयावरून त्यांना ओळखपत्र दाखवण्यास भाग पाडले. यावेळी सुरक्षा रक्षकाकडून धमकावल्याचेही येथील एका विद्यार्थ्याने सांगितले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी शहीद जवान अमर रहे,इन्कलाब जिंदाबाद या घोषणांनी विद्यापीठ दणाणून सोडले.

दरम्यान, दाखल झालेल्या पोलीसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यांनतर विद्यार्थ्यांनी भगतसिंग यांचा एक लेख वाचून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी एनएसयूआय चे विद्यापीठ अध्यक्ष सतीश गोरे, आमिर पठाण, सतीश पवार, रुकसाना कदम, मोहिनी जाधव, अक्षय ओहोळ, आकाश गवंडे, सुरेश साबळे, अक्षय रगतवाण, प्रदीप इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.