पुण्यात जादूटोणा करून कुटुंब उध्दवस्त करण्याची धमकी, महिलेसह तृतीयपंथी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जादूटोणा करुन कुटूंब उध्वस्त करण्याची धमकी देत महिलेकडून १५ हजार रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी महिलेसह एका तृतीयपंथाला अटक केली आहे.

सुनिता पवळे उर्फ सोनी (वय ४५, रा. नाना पेठ) व एक तृतीयपंथी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अनिता संदिप वाघेला (वय ३८) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता सफाई कामगार आहेत. पती आणि दोन मुलांसह डेक्कन परिसरात राहायला आहेत. नववीत शिकत असताना २०१९ मध्ये अनिताच्या मुलाला एका मित्राने परिक्षेआधी फुटलेली प्रश्नपत्रिका पुरविली होती. त्यामुळे कुटूंबाला माहिती न होता अनिता यांच्या मुलाने घरातील दागिने मित्राला दिले होते. त्याची माहिती अनिताला मिळाल्याने त्या चिंता करीत होत्या. त्यानंतर काही दिवसांनी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत साफसफाई करीत असताना अनिताची ओळख सुनिताशी झाली. त्यावेळी सुनिताने मला देवी प्रसन्न आहे, मी जादूटोणा करुन तुझे दागिने मिळवून देते, असे सांगत अनिताकडून 3 हजार रुपये घेतले. त्यानंतर सुनिता एक महिनाभर दिसली नाही. पुन्हा त्यांनी अनिताला गाठून पौर्णिमेला देवीसाठी बकरा कापण्यासाठी 5 हजार रुपये मागितले. मात्र, अनिताने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सुनिताने पैसे न दिल्यास तुझ्यावर देवीचा कोप होईल, जादूटोणा करुन तुझ्या कुटूंबाचे वाटोळे करील अशी धमकी दिली. त्यामुळे अनिताने पुन्हा सुनिताला 5 हजार रुपये दिले. असे करुन सुनिता व एका तृतीयपंथ्याने अनिताकडून वेळोवेळी पैसे उकळून १५ हजार रुपये काढून घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.