पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा फटका सर्व गावाला

नगरः पोलीसनामा ऑनलाइन
गुंडांच्या दहशतीमुळे शैक्षणिक प्रगती उत्तम असलेल्या मुलीला आपले शिक्षण अर्ध्यावरती सोडण्याची वेळ आली आहे.इतकेच नव्हे तर या गुंडाच्या दहशतीमुळे संबधित मुलीला कुलूपबंद घरात बंद करुन ठेवण्याची विदारक वेळ नगर जिल्ह्यातील कोरेगावातील एका कुटुंबावर आली आहे. या गावगुंडाची एवढी दहशत आहे की, या गुंडानी केवळ मुलीचे कुटुंब दहशतीच्या खाली नसून संपुर्ण गावालाच वेठीस धरले आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी गुंड गणेश अप्पासाहेब शेळके (वय ३०) व सोमनाथ ऊर्फ सिद्धेश्वर मेंगडे (वय २८) यांचा जिल्हा सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन फेटाळला आहे. मात्र त्यांना अद्यापही अटक होऊ शकली नाही त्यामुळे पोलिसांच्या अकार्यक्षम कामकाजाचा फटका या संपुर्ण गावाला बसला आहे.

नगर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारे कोपर्डी प्रकरण झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाची अजूनही असलेली संशयास्पद भूमिका.सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे गावही कोपर्डीपासून जवळच आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात यापुर्वीच गंभीर गुन्हे दाखल असतानाही या घटनेला दीड महिन्याचा कालावधी लोटला अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.या प्रकरणातील आरोपी गणेश शेळकेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्या विरोधातील आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याला सोडलेले असले, तरी त्याच्या दहशतीमुळे कोणीही साक्षीदार साक्ष देण्यास तयार होत नाही. यामुळे फिर्यादीस तडजोड करण्यात भाग पाडले जाते. तरी देखील मोठ्या धाडसाने संबंधित गुन्हा अल्पवयीन मुलीने दाखल केलेला आहे.

या प्रकारामुळे मुलीच्या शारीरिक, मानसिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. वारंवार याची तक्रार करुन सुद्धा सर्व सरकारी यंत्रणा गुंडांना पाठीशी घालत आहे. हतबल कुटुंबीयांनी मुलीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीबरोबरच कुटुंबातील इतर सात मुलींच्या शिक्षणाचे दारही बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी देखील अशाच एका मुलीचे शिक्षण संबंधित गुंड गणेश शेळकेमुळे बंद झाले आहे. या बाबतचा २०१४ मध्ये कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. तेही कुटुंब आजही दहशतीखाली आपले जीवन जगत आहे.

काय आहे नेमके प्रकरण
संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना चारचाकी वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे ,विनयभंग करणे, चोरून मुलीचा पाठलाग करणे, अश्लील चाळे व हावभाव करणे, मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, भरधाव गाडी चालवून मुलीच्या अवती भवती फिरणे. आदी प्रकरणात आरोपीच्या विरोधात अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच बाल लैंगिक अपराध विरोधी कायद्याचे कलम सात व आठ (पॉक्सो) नुसार देखील गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या विरोधात एवढ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना देखील आरोपी मोकाट फिरत आहेत.

आरोपींना राजकीय पाठबळ व पोलिसांची कृपादृष्टी
राजकीय पाठबळ व खाकी वर्दी वाल्यांची कृपादृष्टी असल्यामुळे या गावात गुंडच वरचढ तर पीडित कुटुंब दहशतीखाली अशी गंभीर परिस्थिती येथे आहे. झालेल्या अन्ययाबाबत नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, व अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्याकडे वारंवार दाद मागूनही काहीही उपयोग झालेला नाही.

कर्जत पोलिस नागरिकांचे रक्षक की गुंडाचे तारणहार
सर्वसामान्य नागरिकांना पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या पोलिसांनी संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असतानाही त्यांना अजिबात अटक केली नाही. सदर प्रकरणातील गुंड रोजरोसपणे गावात फिरत असताना देखील ते मात्र पोलिसांच्या नजरेतून फरार आहेत. या गावगुंडाची तालिम असून त्यांच्या बरोबर नेहमी पैलवानांची टोळी असते. त्यामुळे गावात त्यांची दहशद आहे. आरोपी दररोज कोरेगावातून फिरत असताना देखील तो मात्र पोलिसांना सापडत नाही. यामुळे कर्जत पोलीस नागरिकांचे रक्षक आहेत की गुंडाचे तारणहार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.