पोलिस निरीक्षकाने घातली स्वामी भक्‍तांच्या पायावर गाडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कर्वेनगर परिसरातील सिध्दी संकल्प म्हाडा सोसायटीच्या पार्किंगमध्ये विश्रांती घेणार्‍या स्वामी भक्‍ताच्या पायावर कार घालण्याचा प्रताप एका पोलिस निरीक्षकाने सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास केला. कार पायवरच पार्क करून ते पोलिस निरीक्षक स्वतःच्या फ्लॅटमध्ये निघुन गेले. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी शेवटी ती कार स्वामी भक्‍ताच्या पायवरून काढून त्यांना रूग्णालयात नेले. घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेशी असभ्य भाषेत संभाषण करून त्या पोलिस निरीक्षकाने चक्‍क पिस्तुल बाहेर काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत बेदरे असे त्या पोलिस निरीक्षकाचे नाव असून ते सध्या सातारा जिल्हयातील शाहुपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते कर्वेनगर परिसरातील सिध्दी संकल्प (म्हाडा) सोसायटीमध्ये रहावयास आहे. स्वामी समर्थांची पालखी सोमवारी परिसरात आली होती. काही स्वामी भक्‍त सोसायटीच्या पार्किंगमध्ये विश्रांती घेते होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निरीक्षक बेदरे हे त्यांची कार घेवुन सोसायटीमध्ये आले. कार पाठीमागे घेत असताना त्यांनी कार स्वामी भक्‍ताच्या पायावर घातली. स्वामी भक्‍तांनी आरडाओरडा केला मात्र बेदरे यांनी कार तशीच पार्क करून स्वतःच्या फ्लॅट गाठला. स्वामी भक्‍तांचा आरडा ओरडा ऐकुन सोसायटीतील पदाधिकारी आणि इतर स्वामी भक्‍त तेथे जमले आणि त्यांनी कार पुढे ढकलुन त्या स्वामी भक्‍ताचा पाय बाजुला काढला. पायाला जखमी झाल्याने स्वामी भक्‍ताला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. सोसायटीत घडलेल्या घटनेचा निरीक्षक बेदरे यांना जाब विचारण्यासाठी एका महिलेने पुढाकार घेतला. महिलेने निरीक्षक बेदरे यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी असभ्य भाषेत महिलेशी हुज्जत घातली तसेच तुम्हाला काय कराचे ते करा, पोलिस चौकीत जा असे म्हणून स्वतः जवळील पिस्तुल बाहेर काढुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सोसायटीत काही तरी गोंधळ चालु असल्याने कोणीतरी प्रकाराची खबर अलंकार पोलिस ठाण्यात दिली. पोलिस ठाण्यातील गणेश माने नावाचे अधिकारी तेथे दोन कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. निरीक्षक बेदरे यांनी त्यांना त्यांची ओळख सांगितली. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्यातील माने आणि इतर दोन कर्मचार्‍यांनी प्रकरण मिटविण्यात धन्यता मानली. पोलिस निरीक्षक बेदरे यांनी महिलेशी असभ्य वर्तन तर केलेच तसेच स्वतःजवळील पिस्तुल बाहेर काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकाराची नोंद करण्यात आली नाही. घडलेला प्रकार हा अतिशय निंदनिय आहे. घडलेल्या प्रकाराबाबत पोलीसनामाला माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीसनामाचे पत्रकार घटनास्थळी पोहचले त्यांनी संबंधित महिलेशी, सोसायटीच्या पदाधिकार्‍यांशी तसेच स्वामी भक्‍तांशी नेमका काय प्रकार घडला याविषयी जाणुन घेतले.

काही स्वामी भक्‍तांनी पोलिस निरीक्षक हे मद्यधुंद असल्याचे पोलीसनामाला सांगितले. मात्र, त्यावेळीची चित्रीकरण उपलब्ध नसल्यामुळे बेदरे हे मद्यधुंद अवस्थेत होते असे पोलीसनामाचे म्हणणे नाही. पोलिस निरीक्षक बेदरे यांनी महिलेशी कशा प्रकारे असभ्य वर्तन केले हे त्या महिलेने कॅमेर्‍यासमोर सांगितल्याने निश्‍चितच बेदरे यांच्यावर कारवाई व्हावी अशी सोसायटीतील नागरिकांची मागणी आहे. सोमवारी रात्री घटना घडल्यानंतर एक स्थानिक पत्रकार सोसायटीत गेले होते. त्यांनी पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतर अलंकार पोलिस ठाण्यातील माने यांनी त्यांना तात्काळ तेथुन बाहेर काढले. माने यांनी असे का केले, त्यांना पोलिस निरीक्षक बेदरे यांच्यावर कारवाई करायची नव्हती का असा प्रश्‍न देखील सोसायटीतील नागरिकांनी आणि स्वामी भक्‍तांनी केला आहे.