पोलिस व्हॅन आणि कन्टेनरचा भीषण अपघात अकरा पोलिस जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पोलिस व्हॅन आणि कन्टेनरचा भीषण अपघात झाला असुन यामध्ये तब्बल अकरा पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. जखमी पोलिस कर्मचार्‍यांना नेवासा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हयातील केडगाव येथे दोन शिवसेना पदाधिकार्‍यांची गोळया झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या झाली होती.

त्यानंतर परगावाहून देखील पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. बंदोबस्त संपल्यानंतर पोलिस व्हॅन परत जात असताना व्हॅन आणि कन्टेनरचा भीषण अपघात झाला. हा अपघात नेवासा तालुक्यातील मालचिंचोला गावाच्या हद्दीत झाला आहे. अपघातामध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचा हात मोडला असून इतर दहा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

सर्वांना उपचारासाठी नेवासा येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जखमी झालेल्या पोलिसांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिस व्हॅनमध्ये एकुण पंचवीस पोलिस कर्मचारी होते.

पोलिस व्हॅन आणि कन्टेनरचा भीषण अपघात अकरा पोलिस जखमी