पोलीस कर्मचाऱ्यासह पिस्तुलचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला अटक

यवतः पोलीसनामा आॅनलाईन

एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असलेली लुटारुंची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केली आहे. पिस्तूलाचा धाक दाखवून हे आरोली लोकांना लुटत होते. मागील चार महिन्यांपूर्वी एका दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. आणि त्यामधील चक्क एक आरोपी अहमदनगर पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.यामुळे अहमदनगर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी घनश्याम शिवराम भापकर (वय २८, रा. वाखारी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अल्ताफ चाँदसाहब पठाण (वय २१, रा. मुळानगर, ता. राहुरी, जि. नगर), आदित्य सुभाष बेल्हेकर (वय २४, रा. डिग्रस, ता. राहुरी), महेश अंकुश खोरे (वय २६, रा. गार, ता. श्रीगोंदा, जि. नगर), विकास सुरेश अडागळे (वय २८, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी आदित्य बेल्हेकर हा अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून क्युआरटी पथकामध्ये कार्यरत आहे.

चौफुला या ठिकाणी पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या मंथन स्पन पाईप दुकानामध्ये ४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास पाईप घेण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दुकानदाराला पिस्तूलाचा धाक दाखवत रोख ५० हजार रुपये व दोन मोबाईल असा मुद्देमाल लुटून पळ काढला होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या पथकाने चोरीला गेलेल्या मोबाईलच्या अनुशंगाने योग्य तपास केला असता , या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर गुन्ह्यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या इतर चार आरोपींना गुरुवारी दौंड येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने (दि. ९) पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पुणे ग्रामिण पोलीस करत आहेत.