पोलीस निरिक्षकाने झापल्यामुळे ‘गायब’ झालेले हवालदार सुखरुप

पुणे : एनपी न्यूज नेटवर्क

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकाने प्रशिक्षणार्थी पोलिसांला चार-चौघात झापल्यामुळे शनिवारपासून एक पोलीस हवालदार ‘गायब’ झाल्याची घटना रविवारी घडली. ‘गायब’ झालेल्या पोलीस हवालदाराच्या नातेवाईकांनी आज (रविवारी) दुपारी एलसीबीच्या कार्यालयातच ठाण मांडले. पोलीस हवालदार ‘गायब’ झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (61, रा. शिवाजीनगर) यांचा शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. एलसीबीतील एका पोलीस हवालदाराची नेमणूक एकबोटे यांच्या घरावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने दोन फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी एकबोटे यांचा जामीन फेटाळला आहे. शनिवारी एलसीबीचे पोलीस निरिक्षक मोठा लवाजमा घेऊन एकबोटे यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घराकडे गेले होते. एकबोटे यांच्या घरावर नजर ठेवणारा हवालदार उपवास असल्यामुळे आडबाजूला जाऊन फळे खात होता. त्यावेळी एलसीबीच्या निरिक्षकाने संबंधित पोलीस हवालदाराला झापझाप झापले. निरीक्षक पोलीस हवालदाराला अपमानास्पद वागणूक देत असताना तेथे प्रशिक्षणार्थी पोलिसांसह इतर कर्मचारी उपस्थित होते. एकबोटे घरी नसल्याने एलसीबीचा फौजफाटा परत पाषाणच्या मुख्यलयात आला. संबंधित पोलीस हवालदाराने निरिक्षिकाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीसह इतर काही गोष्टी लिहून त्या कार्यालयात दिल्या. हवालदाराने लिहीलेल्या अर्जामध्ये आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास आपण जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे. तो अर्ज एलसीबीच्या कार्यालयात ठेऊन संबंधित पोलीस हवालदार ‘नॉट रिचेबल’ झाला. दरम्यान, पोलीस हवालदार घरी पोहचला नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

गायब झालेल्या हवालदाराचा फोनही लागत नसल्याने नातेवाईकांनी हवालदाराच्या मित्रांना फोन करण्यास सुरूवात केली. हवालदाराच्या मित्रांकडून संपूर्ण घटनाक्रम नातेवाईकांना समजला. त्यानंतर नातेवाईकांनी रविवारी दुपारी एलसीबीचे कार्यालय गाठले. घडलेला प्रकार गंभीर असल्याने नातेवाईकांनी एलसीबी कार्यालयात ठाण मांडले होते. एलसीबीच्या निरिक्षकाने संबंधीत हवालदाराला खुपच झापल्याने एलसीबीतील इतर कर्मचारी देखील नाराज झाले आहेत. पोलिसांनी आता गायब झालेल्या त्या हवालदाराचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

संबंधीत हवालदाराने एलसीबीच्या कार्यालयात जमा केलेल्या तक्रार अर्जाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवालदाराने काहीतरी बरेवाईट करून घेतले तर ती जबाबदारी घेणार कोण? हा देखील मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महत्वाचे : संबंधित पोलीस हवालदार कामाच्या व्यापामुळे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे ते शनिवारी रात्री त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. दरम्यान, रविवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करुन आपण सुखरुप असल्याची माहीती दिली आहे. खात्रीशीर माहिती एलसीबीच्या वरीष्ठ पोलीस निरिक्षकांनी पोलिसनामाला दिली. अस्वस्थ झाल्यामुळेच संबंधित हवालदार कोणाला काहीच न सांगता मित्रांकडे आराम करण्यासाठी गेले होते. आता ते सुखरुप आहेत.