फ्लॅटचा मालमत्ता कर माफ करण्यास सरकार अनुकूल

मुंबई : पोलिसानामा ऑनलाईन
मुंबईतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत मुंबईवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबई महानगरापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. या संदर्भातील प्रस्ताव मुंबई महाालिकेने संमत करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. याची आठवण विधानसभेतील या चर्चेत बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली होती. तर दुसरीकडे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ७०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याची मागणी विधानसभेत केली होती.

भाजपाच्या आमदारांची मागणी उचलून धरत मुंबईतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता करत माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेने या संदर्भातील वैधानिक कार्यवाही करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांना हे शक्य आहे, मात्र इतर महापालिकांना ते शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.