झोकात निघाली संमेलनाची ग्रंथदिंडी

बडोदा: विशेष प्रतिनिधी (महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी)

राजघराण्यातील मान्यवरांचा सहभाग, राजमंदिरात झालेले ग्रंथपूजन, सजवलेले चित्ररथ, विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग, बडोद्यातील व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांची साथ आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून रसिकांनी दिलेली मानवंदना. अशा वातावरणात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी संमेलनाच्या पूर्वसंध्येला झोकात निघाली. ग्रंथदिंडीत पारंपरिक पेहरावातील स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. शालेय विद्यार्थ्यांची लेझीम पथके, ढोलताशा पथकांनी ग्रंथदिंडीला जोश मिळवून दिला. मराठमोळ्या पोशाखातील महिलांची अनेक पथके फुगड्या घालत, भजने गात, टाळ वाजवत दिंडीत सहभागी झाली होती.

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला राजमहालाच्या प्रवेशद्वारापासून ग्रंथपूजनाने ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. सुमारे वीस चित्ररथांचा दिंडीत समावेश होता. बडोद्यातील काही आखाड्यातील (व्यायामशाळा) युवकांनी मल्लखांबाची आकर्षक प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. महाराणी चिमणाबाई प्रशालेच्या साडेपाचशे विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग या दिंडीत होता. ज्येष्ठ नागरिकांचे पथकही दिंडीत लक्ष वेधून घेत होते. केशरी फेटे परिधान केलेले पुरुष आणि जरीच्या वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या महिलांची मोठी गर्दी दिंडीत होती.

संमेलनाध्यक्षही सहभागी
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे पत्नी अंजली देशमुख यांच्यासह मस्तकी फेटा बांधून ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशीही होते. महामंडळाचे अन्य पदाधिकारी, घटक संस्था, संलग्न संस्थांचे प्रतिनिधी ग्रंथदिंडीत सामील झाले होते.