बारामतीची लोकसभा काँग्रेस लढवेल : देवीदास भन्साळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर लोकसभा मतदार संघावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीच तशी घोषणा बुधवारी पुण्यात केली त्यावर काँग्रेस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत. त्याच मतदार संघात काँग्रेस निवडणूक लढवेल असे एका पत्रकाद्वारे सांगून पुणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे पेच निर्माण केला आहे.

बारामती लोकसभेचे माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी दोनवेळा खासदार म्हणून काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. तसेच त्या मतदारसंघात सहा पैकी जेजुरी, सासवड, भोर, इंदापूर या चार नगरपालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. शिवाय चार साखर कारखाने, दोन पंचायत समित्या, चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. बरेच जिल्हा परिषद सदस्य आणि दोन जिल्हा बँकेचे सदस्य काँग्रेसचे आहेत. मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक, भाजप एक, शिवसेना एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. यातील इंदापूर आणि पुरंदर मतदारसंघात अगदी थोड्या मतांनी काँग्रेस पराभूत झाली आहे आणि सध्या भाजप सरकारबद्दल भ्रमनिरास झाल्याने जनतेत असंतोष आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस बद्दल अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मतदारसंघातील राजकीय स्थिती आणि जनमानस पहाता काँग्रेस मजबूत स्थितीत असून बारामती मतदारसंघात काँग्रेसच निवडणूक लढविणार असल्याचे भन्साळी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पुणे जिल्हा काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र, माजी अध्यक्ष भन्साळी यांनी दादांना प्रत्यूत्तर दिले आहे त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात भन्साळींच्या पत्रकाची चर्चा रंगली आहे.