बारामती तालुक्यात हरणाची शिकार करून पार्टी

बारामती : पोलीसनामा ऑनलाई

बारामती तालुक्यातील क-हावागज गावातील क-हा नदी पात्रात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करुन पार्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे. तर क-हावागज परिसरातील वन परिक्षेत्रामध्ये चिंकारा हरणाचा मृतदेह आढळून आला आहे. या हरणाचा मृत्यू संशयास्पद झाला आहे. तर क-हा नदीपात्रात झालेल्या पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी सापडलेल्या मटणाच्या तुकड्यावरुन वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत.

रविवारी (दि.25) क-हा नदीच्या पात्रात वाळू उपसा करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यामध्ये चिंकारा जातीच्या हरणाशी मिळतेजुळते अवषेश मिळून आले. तसेच नदीपात्रात तीन दगडांची चूल, त्यामध्ये भाजलेल्या नख्या, कु-हाड, सुरे, दारुच्या बाटल्या, हडाकांचे तुकडे आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राचे अधिकारी सुधाकर फरांदे, वनपाल टी.जे. जराड, सातपुते, वनरक्षक आर.डी. इंगवले, वनमजूर भानुदास बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच घटनास्थळावून महत्वाचे पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. अधिका-यांनी ताब्यात घेतलेली कवटी आणि इतर अवशेष तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच कऱ्हावागजच्या वनविभागात एका चिंकारा हरणाचा संशयास्पद मृत्यू झाला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात. तहान भागवण्यासाठी चिंकारा हिरण मानवी वस्तीकेडे येतात. परंतु मानवी वस्तीकडे येणे या हरणांच्या जिवावर बेतत आहे. बारामती तालुक्यातील क-हावागज, ढाकाळे, पणदरे, उंडवडी, जाराडवाडी, गोजूबावी या भागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागात चिंकारा जातीच्या हरणांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

या ठिकाणी दुर्मिळ वनौषधींसोबत तरस, लांडगा, रानमांजर, सायाळ, वानर, ससा, मोर, गिधाड, घुबड यांचीही संख्या मोठी आहे. पाण्याचा स्रोत नसल्याने वन्यप्राण्यांवर संकट कोसळले आहे. ज्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा अधिवासात पाणी नसल्याने हरिणांना तहान भागविण्याकरिता मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे या भागात हरिणांची शिकार होत असल्याची चर्चा नेहमीच असते. पुण्यासह बारामती, फलटण भागातील लोक शिकारीसाठी येत असल्याचे बोलले जाते. त्यात स्थानिक नागरिक देखील कमी नाहीत. पाळीव कुत्र्यांच्या मदतीने ससे, घोरपड, हरीण यांची शिकार होत असते. तसाच काहीसा प्रकार येथे घडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. परंतु तपासणी अहवालानंतरच येथे झालेली पार्टी नेमकी कशाची होती, याबाबत सांगता येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

बारामती तालुक्यात हरणाची शिकार करून पार्टी