बालविकास मंत्र्याच्या जिल्ह्यात दहा टक्क्यांहून अधिक वस्तीगृह बंद

बीड: पोलीसनामा ऑनलाईन
महिला बालविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरीत झालेल्या पाल्यांच्या मुलांना गावात जेवणाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने नोव्हेबर २०१७ दरम्यान सुरू केलेल्या हंगामी वस्तीगृहाची तपासणी मोहीम शनिवारी दिवसभर सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण वस्तीगृहांपैकी दहा टक्के पेक्षा जास्त वस्तीगृह बंद स्थितीत असल्याचे प्रथम पहाणीत आढळले. अंतिम अहवालात बंद अथवा बायोमेट्रीक न वापरलेल्या वसतीगृहांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे देखील सूत्रांचे म्हणणे आहे.

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पुढाकार घेत बीड जिल्ह्यातील तालुका निहाय हंगामी वसतीगृहांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. शनिवारी यासाठी वेगवेगळ्या विभागातील २९५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा अकरा तालुक्यांमध्ये पाठविला. पथके वसतीगृहांवर पोहचताच वसतीगृह चालकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र सर्व तालुक्यांमध्ये पहायला मिळाले.
बीड जिल्ह्यात एकूण ५८७ हंगामी वसतिगृह आहेत. यामध्ये ३३ हजार ९३५ एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत. ही कागदावरची माहिती प्रत्यक्षात खरी आहे का? हे पहाण्यासाठी शनिवारी पथकांनी थेट वसतीगृह गाठले. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान अचानक पथक वसतीगृहावर आले असल्याचे पाहून वसतीगृह चालकांना घाम फुटला. प्रामाणीकपणे वसतीगृह चालविणाऱ्यांनी आपल्याकडील सर्व माहिती पथकाला दिली. मात्र काही तालुक्यात पूर्वींच हंगामी वस्तीगृह बंद केली आहेत, त्यांचा गोंधळ उडाला. यामध्ये ५०-६० च्या आसपास वस्तीगृह बंद स्थितीत असल्याचा अंदाज आहे.

हंगामी वस्तीगृहांची झालेल्या तपासणीत काय झाले. याचा अहवाल दोन दिवसात पूर्ण केला जाणार असल्याचे सांगितले जाते. या अहवालात काय माहिती समोर येते याकडे लक्ष द्यायला हवे.