बाळाच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
ससून रुग्णालयात दाखल झालेल्या दोन वर्षाच्या बाळाने सेफ्टी पिन गिळली होती. ससून मधील कान,नाक,घसा तपासणी विभागात बाहेरील एका दवाखान्यातून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. आईच्या सांगण्याप्रमाणे बाळाने सेफ्टी पिन गिळली होती.
प्राथमिक तपासणीमध्ये कान व नाक सामान्य तर तोंडाच्या पोकळीमध्ये लाळ साठून राहिलेली आढळली. छातीची बाकी तपासणी सामान्य असली तरी
क्ष-किरण तपासणीमध्ये गळ्याभोवतालच्या हाडाजवळ एक सेफ्टी पिन उलटी आणि उघडलेल्या अवस्थेत दिसली.
निदान होताच बाळाला त्वरित शस्त्रक्रिया विभागात नेऊन सर्वसाधारण भूल देऊन (rigid direct oesophagoscopic) अन्ननलिकेची आतून तपासणी करण्याच्या साधनाने (long foreign body forceps) शस्त्रक्रियेचा लहान चिमटा वापरुन राखाडी रंगाची सेफ्टी पिन काढण्यात आली. या बालरुग्णाला चोवीस तास देखरेखी खाली ठेवून कोणत्याही प्रकारची उल्टी, श्वास कोंडणे, गिळण्याकरिता अडचण किंवा इतर काही तक्रारी नाहीत याची खात्री करून घरी सुखरूप सोडण्यात आले.
डॉ. अजय चंदनवाले (अधिष्ठाता बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीर जोशी, डॉ. नीरज नलावडे, डॉ. सोनाली देवांग, डॉ. राहूल ठाकूर या सर्व डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

बाळाच्या घशात अडकलेली सेफ्टी पिन काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया