बिटकॉईनच्या जादा परताव्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बिटकॉईनचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आठ जणांना सायबर क्राईम सेल पुणे यांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत पुण्यातील २५ नागरिकांनी बिटकॉईनच्या संदर्भात फसवणूक झाल्याची तक्रार पुणे सायबर सेलकडे केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सायबर गुन्हा करण्यामध्ये कसलेले गुन्हेगार आहेत.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून आकाश कांतीलाल संचेती (रा. मुकूंद नगर, पुणे ), काजल जितेंद्र शिंगवी (वय – 2५, महर्षीनगर, पुणे ), व्यास नरहरी सापा ( वय -४६ , रा. १०५८ भवानी पेठ पुणे ) व निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात हेमंत विश्वास सुर्यवंशी ( रा. बाणेर पुणे ४५ ), हेमंत बाबासाहेब चव्हाण ( रा. हडपसर, पुणे ), अजय तानाजी जाधव ( रा. काळेवाडी फाटा, पुणे ), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (रा. नवी दिल्ली ), हेमंत चंद्रकांत भोपे (रा. डि.एस.के. विश्व धायरी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुंतवणुक योजनेत गेन बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटकॉईन असे अठरा महिन्यात एका बिटकॉईनचे १.८ बिटकॉईन असा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत नागरिकांची फसवणुक केल्याचा हा प्रकार आहे. आभाषी चलन वापरून साधारण आठ हजार जणांची फसवणुक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लोकांची फसवणुक करणाऱ्या या आरोपींची मोठी साखळी असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्यात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळेत अनेकांना बिटकॉइनमध्ये चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून गेट बिटकॉईन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते.

सदर फसवणुकीमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी व गेन बिटकॉईन कंपनीने संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना ठरल्याप्रमाणे बिटकॉईनमध्ये परतावा देत नव्हते. त्या बदल्यात बाजारात शुन्य किंमत असलेले गेन कंपनीचे बिटकॉईन स्वतः तयार करुन ते क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा केल्याचे भासवत लोकांची करोडो रुपयांची फसवणुक केली आहे.

यावेळी आयटी तज्ज्ञ पंकज घोडे यांनी हा आभासी चलनाचा प्रकार तसेच यामध्ये लोकांची फसवणुक कशाप्रकारे केली जाते हे स्पष्ट केले. राज्यात बिटकॉईनच्या संदर्भात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे शहरात दोन गुन्हे दाखल आहेत.
आत्तापर्यंत पुण्यातील २५ नागरिकांनी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झाली असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे केल्या आहेत. त्यामध्ये फसवणुकीची रक्कम २.२५ कोटी असल्याचे तपासात समोर आले आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडून आभाषी चलणाच्या विळख्यात फसू नका. गुंतवणूक करताना खात्री करा. तसेच कोणाची जर गेन बिटकॉईन कंपनीत बिटकॉईन गुंतवणुक करून फसवणुक झाली असेल तर त्यांनी तात्काळ सायबर सेल, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याशी ०२०- २६१२३३४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.

सदरची कारवाई पुणे शहराच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ व त्यांच्या सहकार्यानी केली.