बीएमसीमधील सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

जलशुद्धी यांत्राच्या किंमतीच्या तीन टक्के रक्कम देण्याची मागणी करुन ५० हजाराची लाच स्वीकारताना मुंबई महानगर पालिकेतील एका सहाय्यक अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

महानगर पालिकेतील मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल विभागातील सहायक अभियंता प्रमोद दिनकर भोसले (महानगर पालिका भायखळा विभाग, मुंबई ) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

भोसले याने मुंबई महानगर पालिकेसाठी जलशुद्धी यंत्र मागितले होते. या संपूर्ण (मशीन) यंत्राची एकूण किंमत 1,80,30,000 / एवढी होती. आरोपी भोसले याने एकूण रकमेच्या ३ टक्के रक्कम स्वतःला देण्याचा सौदा समोरच्या व्यक्तीशी केला होता. याप्रकरणी ४६ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिल्यानतंर पोलिसांनी सापळा लावून आज (गुरुवारी ) आरोपीला ५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याला बेड्या ठोकल्या. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. भोसले विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई युनिटने केली आहे.